Sunday, 14 May 2017

मिठू माउली

“मित्रा इथे काजू नाहीतर मग सफरचंद कुठे मिळेल?...”
“काय, सरकला आहेस की काय?” असं म्हणून तो उडाला.

थोड्यावेळाने हाच प्रश्न दुस-याला विचारला, आणि त्याचेही उत्तर तसेच, पुढे तो म्हणाला -
“कुठून आला आहेस तु? इथला वाटत नाहीस आणि बोलतोस ही वेगळा. अरे इथे पेरु आणि चिक्कूची मारामार.... आणि तु डायरेक काजू, सफरचंद विचारतोस..", आणि तो ही उडाला. 

फार भूक लागली होती.. या आधी एवढी भूक कधीच लागली नव्हती. थोडा गोंधळ केला की मम्मी लगेच काही ना काही तरी खायला द्यायची, असो, पण आता मम्मी नाहीये ना, मग काहीतरी खटपट करावीच लागेल.
थोड्यावेळाने तिस-याला हाच प्रश्न नाही विचारला. त्याला वाचारलं, “मित्रा, इथे खाण्यासाठी जवळपास कुठे काही मिळेल का? जाम भूक लागली आहे.” नंतर तो मला घेऊन गेला आणि आम्ही पोटभर डाळींब खाल्ले. “पोटात आग पडली की डाळींब सुद्धा गोड लागतात, काजू आणि संफरचंदासारखे.” 
तो म्हणाला, “ही डाळींबाची बाग तर प्रत्येकाला माहीत आहे. तु नवीन दिसतोस. कुठून आलास.”
“इथलाच आहे पण आजच घराबाहेर पडलो.”
“काय...?” उगीच माणूसमांची मारु नकोस, खरं काय ते सांग ना, बस का राव, यार मी तुला इथे बागेत घेऊन आलो आणि तु आपल्याला नाही सांगणार.”
“सांगतो सांगतो. पण हे ‘माणूसमांची’ म्हणजे काय?”
“अर, ते लोक साले, कसे पोपटपंची म्हणतात तसं मग आपण ‘माणूसमांची’ म्हणायचं, म्हणजे थापा मारणरे. तुला काहीच कसं माहीती नाही? बरं ते सोड, इथलाच म्हणजे कुठला?.”
“मी इतके दिवस एक घरामध्ये राहत होतो. घरामध्ये म्हणजे त्या घरात माझं एक छोटसं घर होत.”
“काय....! घरात”
“हो”.
“आणि काय म्हणालास छोटसं घर, म्हणजे जेल.”
“जेल..?”
“अरे, पिंजरा रे बरा पिंजरा.”
“बर....बर..... बर....बर.....” तु पिंज-यातुन सटकुन-पळून आलायस. बास नादच. मानला तुला. चल आता, ही करामत कशी केली detail मध्ये सांग.”
“अरे भाऊ, मी पळून वगैरे नाही आलो. त्यांनीच मला सोडलं आणि आता ते काळजी करत बसले असतील, माझी.”  
“काय ? त्यांनीच तुला सोडलं हे काय नवीन. परतं माणुसमंची सुरु केली का तु?” 

“नाही रे. खरंच.”  
“कसं. काय शक्य आहे हे, माझा विश्वास बसेल असं काहीतरी सांग राव.”  
“ठीक आहे. पण हे सगळं तुला समजवुन पचवायचं असेल तर, सगळ सुरवातीपासुन सांगाव लागेल. आणि वेळ ही लागेल सांगु?”  
“हो सांग. मी आज निवांतच आहे आणि आता पोटभर डाळींब पण हानलय. कर सुरु”
ठीक आहे.  ऐक -
“मी, मम्मी, आण्णा, दादा आणि भाऊ असे आम्ही पाच जण राहायचो. दादा मोठा, भाऊ छोटा, मम्मी त्यांची आई आणि आण्णा त्यांचे वडील.”
“बर......बर”
“ऐके दिवशी- भर दुपारी भाऊ मला घेऊन घरी आला. माझे डोळे देखील उघडले नव्हते. आणि म्हणाला मम्मी याला काहीतरी खायला दे. मम्मी त्याला म्हणाली. तु कशाला असले उद्योग करतोस उगीच त्या बिचा-याचे हाल. भाऊने सांगितले की त्याच्या मित्राने मला एका झाडातुन काढले आणि त्या मित्राचे घरचे मला घरात घ्यायला तयार नाहीत. म्हणुन तो मला घेवून घरी आला. अशा प्रकारे माझी घरात Entry झाली.”
“जरा पचतील अशा थापा मारतो का? तुझे डोळे देखिल उघडले नव्हते ना मग हे सगळं तुला कस माहीती?” 
“अरे प्रत्येक पाहुना घरात आला की हेच बोलायचा कशाला त्या बिचा-याचे हाल करताय आणि मग त्याला वरची सगळी story सांगीतली जायची. जर त्यांनी मला त्या दिवशी घरात घेतले नसते तर, माहीती नाही माझं काय झाल असतं."
“बर पुढे.”
“पुढे त्यांनी मला, लहानाचं मोठ केलं. जीवापाड जपलं. चौघेजन मला सारख काही ना काहीतरी खाऊ घालायचे. सकाळी- दुपारी- संध्याकाळी- रात्री- पहाटे सारखे खाऊ घालायचे.”
“माझ तर काय डोकंच चालेना ऐकावं ते नवलंच.”
“हा मी बोललो होतो ना तुला. आण्णा भारी आहेत. ते नेहमी मला नवीन-नवीन गोष्टी खाऊ घालायचे. दादा आणि भाऊ नको-नको म्हणायचे. पण ते ऐकत नसत. ते म्हणायचे की काही नाही होत त्याला नको असेल तर तो नाही खाणार आणि ते चारायचे. मी काय-काय खाल्लय सांगु – मीठ, लिंबु, साखर, काजु, बदाम, पिस्ता, शेंगदाणे आणि मग फळे बरीच पण मला आवडायचं ते सफरचंद आणि सगळ्यात जास्त काजु.”
“ऐश केली की राव, तु.”
“मग कसं असतं?”
पण नंतर मग दादा आणि भाऊ शिकायला बाहेर गावी गेले. मग फक्त मी मम्मी आणि आण्णा. मग कधी-कधी मी त्यांच्याशी मोबाईलवर बोलायचो. दादा आणि भाऊ यांना काही कळायचं नाही की मला काय हवयं काय नको पण आण्णांना आणि मम्मीला बरोबर कळायचं. मम्मीला जास्तं.
“एकदा दादा मला शेंगदाणे चारत होता. मला नको होते शंगदाणे तरी तो चारत होता. मग तो म्हणाला. मम्मी हा बग शेंगदाणे खात नाहीये. मग मम्मीने त्याला सांगितलं की, अरे त्याला कालच शेंगदाणे दिले होते आता नको असतील एक काम कर ते सफरचंद काप त्याला पण चार आमि तु पण खा. एकदा मी खुप गोंधळ करत होतो, मग आण्णा मला काजु चारायला लागले पण मला काजु नको होता. मग आण्णा मम्मीला म्हणाले ए बघ जरा हा का गोंधळ घालतोय. मग मम्मी म्हणाली, अहो त्याला पाणी द्या तहाण लागली असेल. आण्णा म्हणाले त्याच्या वाटीत पाणी आहे. मम्मी म्हणाली, अहो त्याने ते सगळे खराब केले असेल, ते ओतुन द्या आणि दुसरे द्या त्याला. मग मी गटागट पाणी पिलो आणि एक झोप काढली.”
“हे सगळं ठीक आहे. पण मम्मीला कसं कळायचं की तुला काय हवंय.?”
“अरे या प्रश्नाचं उत्तर कोणच सांगु शकणार नाही. तिला सगळं बरोबर कळायचं. मी ब-याचदा एकलय, आण्णा म्हणायचे- ”
“अगं तुला काय माहीती, इथं काय चाललंय आणि तुझं काय मध्येच.”
भाऊ म्हणायचा –
मम्मी, तुला काही माहीती नसतं, तु मध्ये मध्ये नको करु.
दादा म्हणायचा –
मम्मे, तस नसत गं बाळा, तुला नाही माहीती¸ तु थांब जरा.

तिघेही म्हणायचे तुला नाही माहीती पण तिला माहीती असायचं की कोणाला कधी काय हवयं.
तिला माहिती असायचं, मला काजु हवाय का पाणी हवय की सफरचंद की काहीच नको. 
तिला माहीती असायचं –
भाऊ का चिडलाय त्याला काय हवयं.

तिला माहीती असायचं –
दादाला काय खावसं वाटतयं.

तिला सगळ सगळ माहीती असायचं. पण मम्मीला कधी काय हवयं हे या तिघांना माहीती आहे की नाही काय माहीती.

असो, तुला अजुन एक किस्सा सांगतो. एकदा मी आजारी होतो, म्हणजे थोडा अशक्तपणा आला होता. त्यामुळे हालचाल नाही, गोंधळ नाही, काही खाण्याची इच्छा नाही. आण्णा घरी आले आणि मम्मीला म्हणाले याला काय झालय गं? मम्मी म्हणाली, अहो बघाना सकाळ पासून आवाज नाही काही खात पण नाहीय, काजु दिला, सफरचंद दिला, तरी नको. आण्णांनी ओळखलं, अग आजारी वाटतोयतो आणि त्यातुन त्याने काही खाल्ल नाही त्यामुळे Energy  नसेल. त्यांनी भाऊला आवाज दिला आणि एक Glucon-D पावडर आणायला सांगितली. तेवढ्यात दादा म्हणाला आण्णा अहो काही पण कसं चारताय त्याला ते माणसांसाठी आहे. त्याला कशाला. पण त्यांनी मला ती पावडर चारली. गोड होती आणि थोड्यावेळाने जरा ताकद आल्यासारखं वाटलं. मग आण्णा दादाला      म्हणाले – एकदा कोंबड्यांना जुलाब लागले होते. (आण्णा एका Poultry form मध्ये Senior Supervisor होते.) तर त्या कोंबड्यांना सगळ्या मोठ्या मोठ्या डाँक्टरांनी तपासल आणि वेगवेगगळे औषधोपचार केले. पण जुलाब काही थांबेना. कोंबड्या सगळ खात-पित व्यवस्थित होत्या. पण जुलाब चालुच. शेवटी डाँक्टर म्हणाले काही कळेना अस का होतय. अस जर चालु राहीलं तर एके दिवशी हा सगळा लॉटच मरुन जाईल. शेवटी मी विचार केला आज ना उद्या या सगळ्या कोंबड्या मरणार, मग आपली एक treatment करुन बघु. मेडीकल मध्ये एक छोटीशी पिवळी गोळी मिळते, जुलाबासाठी, ती जर घेतली तर एक माणूस दोन दिवस tight होतो. मग मी माझच calculation केले.
एका गोळी मध्ये 70 किलोचा एक माणूस tight तर
एका गोळी मध्ये 1..2 किलोच्या साधारण 40-50 कोंबड्या tight झाल्या पाहीजेत. मग एका कामगाराला पाठवुन आसपासच्या मेडिकल मधल्या सगळया गोळ्या गोळा केल्या. त्याची पावडर बनवली आणि सगळ्या कोंबड्याना ती खाद्यातुन चारली.

दादा तर वेडाच झाला. काय माणसांच्या गोळ्या तुम्ही कोंबड्यांना चारल्या? मग –
“मग काय संगळ्या कोंबड्या 4 दिवस tight.”  
“सगळ्या कोंबड्या 4 दिवस tight.”  
हा.......हा.........हा....”
“अरे, आण्णांनी हे सांगितल्या नंतर दादा, भाऊ आणि मम्मी सगळे जन असेच तुझ्यासारखे जोर जोरात हसत होते”

“सगळ्या कोंबड्या 4 दिवस tight” अस म्हणत.”

मग आण्णांनी दादाला सांगितलं की, मी असा आधीच एक Experiment केला होता. So याला Glucon-D चारली तर काही होणार नाही. तु नको tension घेऊ. आण्णा म्हणजे खुप Danger  नेहमी, असले काहीतरी किस्से दादाला आणि भाऊला सांगायचे.”
“भारी राव तुझे सगळे हे लाड, ऐश पाहून मला काहीच समझेना, बर मला जावं लागेल. आता बाकीची Story उद्या सांग. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुला सोडलं का ते...”

2 comments: